
छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मराठवाड्याचा विकास : तुमसे ना हो पायेगा!’ या मराठवाडाव्यापी आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी सर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली..
या बैठकीत आंदोलनाची व्यापक तयारी, नियोजन आणि सरकारच्या मराठवाड्याबाबतच्या उदासीन धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली..
मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारने या भागातील जनतेच्या पदरी नेमके काय दिले, याचा आता हिशेब मागण्याची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे आश्वासने, घोषणा आणि भूमिपूजनांचा दिखावा सुरू आहे; मात्र मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रश्न, रोजगाराची कमतरता, उद्योगांचा अभाव, आरोग्य व शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न आजही मराठवाड्याच्या माथी कायम आहे..
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजे या भूमीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. ज्या शूरवीरांनी निजामाच्या जुलमी राजवटीविरोधात संघर्ष केला, त्याच मराठवाड्याच्या जनतेला आज विकासाच्या मूलभूत हक्कांसाठी पुन्हा संघर्ष करावा लागत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे..
सरकारने मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी फक्त आकडे, घोषणा आणि आश्वासनांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता कागदावरील विकास नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर झालेला विकास दाखवा, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेची असणार आहे..
या आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हक्काचा निधी, पाणी, सिंचन, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांबाबत सरकारला जाब विचारला जाणार आहे.. त्यामुळे या आंदोलनात सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले..
यावेळी भारत (नाना) इंगळे, संजय (मामा) निंबाळकर, भारत सांगळे, प्रदीप बप्पा मेटे, जगन्नाथ गवळी, अमोल बिराजदार, रवी वाघमारे, राज अहमद पठाण, जगदीश शिंदे, विलास थोरबोले, पांडुरंग भोसले, अण्णा पवार, अमोल मुळे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis