
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)
वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल; नागरिकांची मोठी गर्दी
रिद्धपूर ते आस्टोली मार्गावर शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एका वृद्ध व्यक्तीला वाघाचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
वाघ दिसल्याची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पथकाने परिसराची पाहणी करून वाघाचा माग काढण्यास सुरुवात केली असता त्यांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात वाघाचा वावर असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. दरम्यान, वाघाच्या दर्शनाची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाला पाहणी आणि शोधमोहीम राबविताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र होते.वनविभागाकडून परिसरात नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेस्क्यू टीमकडून परिसरात शोधमोहीम सुरू असून पुढील तपासणी जोर्यात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी