
पुणे, 05 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. सांस्कृतिक पैलू तसेच तर्कावर आधारित विधायक प्रथा-परंपरांमागील विज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचे १४ वर्षांनंतर पुन्हा वितरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांनी शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य क्षेत्रात मूलभूत योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात यावेत, अशी मागणी डॉ. सागर देशपांडे यांनी केली होती. ही मागणी मान्य करून पुरस्कार पुन्हा सुरू करताना आनंद आणि कृतार्थता वाटत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुढील वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही पाटील यांनी केली.
पुरस्कार निवडीबाबत बोलताना पाटील यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा विचार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या चिठ्ठीवर हे पुरस्कार देण्यात आलेले नसून, केवळ गुणवत्तेच्या आधारे पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
“मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. पुढील पिढीत चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे,” असे पाटील म्हणाले.
यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयांतील पुरस्कारप्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु