
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मंद्रूप पोलिसांनी कारवाई करत ६ लाख ९३ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि १६ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण २२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांना पांढऱ्या रंगाच्या एक्सयूव्ही-५०० वाहनातून गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, श्रीशैल शिवणे आणि मनोज राठोड यांच्यासह पोलिस पथकाने नांदणी येथे नाकाबंदी केली.नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहन थांबवून पोलिसांनी त्याची तपासणी केली. वाहनातील पोत्यांची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत ६ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा आणि १६ लाख रुपयांची एक्सयूव्ही-५०० कार, असा एकूण २२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड