कमी क्षेत्राची जमीन खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांची अडचण; तहसीलदारांकडे परवानगीची मागणी
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। महसूल विभागाने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी क्षेत्राची किमान मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार बागायती क्षेत्रासाठी १० गुंठे, तर जिरायती क्षेत्रासाठी २० गुंठ्यांची मर्यादा आहे. मात्र, घरकूल, शेतीचा रस्ता आणि विहिरीसाठ
कमी क्षेत्राची जमीन खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांची अडचण; तहसीलदारांकडे परवानगीची मागणी


सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। महसूल विभागाने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी क्षेत्राची किमान मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार बागायती क्षेत्रासाठी १० गुंठे, तर जिरायती क्षेत्रासाठी २० गुंठ्यांची मर्यादा आहे. मात्र, घरकूल, शेतीचा रस्ता आणि विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करता येते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह थेट प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागते.

अर्जाची पडताळणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कमी क्षेत्राच्या खरेदीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया आहे. मात्र, गुंठेवारीच्या मर्यादेमुळे घरकूल बांधणे, सिंचनासाठी विहीर खोदणे अथवा शेतीसाठी रस्ता तयार करण्यासाठी काही गुंठे जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकरणांत सक्षम प्राधिकरणाची, म्हणजे जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे.

कमी क्षेत्राच्या खरेदीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून प्रांत कार्यालयात वारंवार ये-जा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी होत आहे.

या अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी जमीन खरेदी-विक्रीची अधिकृत प्रक्रिया न करता १०० किंवा ५०० रुपयांच्या बॉण्डवर काही गुंठे जमीन घेतल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा जागेवर विहिरी खोदण्यात आल्याचेही सांगण्यात येते. मात्र, अशा व्यवहारांमुळे भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande