पुणे - गणेशोत्सवाच्या देखाव्यांत एआयचा जागर
पुणे, 05 सप्टेंबर (हिं.स.)। एका रोबोटशी संवाद साधायचा असेल, संरक्षण आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कसा केला जातो, हे जाणून घ्यायचे असेल किंवा एआयची दुनिया समजून घ्यायची असेल, तर यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे त्यासाठी खास ठरणार
Kasba Ganpati


पुणे, 05 सप्टेंबर (हिं.स.)। एका रोबोटशी संवाद साधायचा असेल, संरक्षण आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कसा केला जातो, हे जाणून घ्यायचे असेल किंवा एआयची दुनिया समजून घ्यायची असेल, तर यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे त्यासाठी खास ठरणार आहेत. काळानुरूप बदल स्वीकारत पुण्यातील गणेश मंडळांनी यंदा आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित देखाव्यांची संकल्पना साकारण्यास सुरुवात केली आहे.

एआयचा प्रत्यक्ष वापर दाखविणाऱ्या वर्किंग मॉडेल्सपासून रोबोटशी संवाद, स्मार्ट शेती आणि संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध संकल्पना या देखाव्यांमधून उलगडणार आहेत. सध्या शहरातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देखाव्यांच्या तयारीला वेग आला असून, तंत्रज्ञानाधारित संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे.

सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे असून, एआयने जवळपास प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याचीच झलक आता गणेशोत्सवातील देखाव्यांमध्येही पाहायला मिळणार आहे. शहरासह उपनगरांतील काही गणेश मंडळांनी एआयला देखाव्याचा केंद्रबिंदू बनविले आहे, तर काही मंडळांकडून देखावे साकारतानाच एआयचा वापर केला जात आहे.

एआयच्या माध्यमातून छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य डिजिटल साहित्य तयार करून देखाव्यांच्या सजावटीला आधुनिक रूप दिले जात आहे. काही मंडळांचे कार्यकर्ते एआय आणि त्याच्या विविध उपयोगांचा अभ्यास करून त्यानुसार देखाव्यांची संकल्पना विकसित करीत आहेत.

विशेषतः कृषी क्षेत्रातील स्मार्ट तंत्रज्ञान, पिकांचे व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्रातील आधुनिक प्रणाली तसेच रोबोटिक्स यांसारख्या विषयांचा समावेश देखाव्यांमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच गणेशभक्तांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे आणि नव्या पिढीमध्ये एआयविषयी कुतूहल निर्माण करणारे देखावे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande