
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विमानसेवा पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्याचे चित्र आहे. स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानफेरी रद्द होणे, फ्लाय९१ची सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद सेवा अद्याप नियमितपणे पूर्ववत न होणे, तसेच सोलापूर-तिरुपती थेट विमानसेवा अद्याप सुरू न होणे, ही बाब सोलापूरकरांसाठी चिंतेची असल्याचे सोलापूर विकास मंचाने म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांना विमानसेवेबाबत केवळ आश्वासने मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्षात विश्वासार्ह आणि नियमित हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असल्याची टीका मंचाने केली आहे.
विमानसेवा ही केवळ प्रवाशांच्या प्रवासाची सुविधा नसून शहराच्या औद्योगिक, व्यावसायिक, आयटी, पर्यटन आणि आर्थिक विकासाची महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. गुंतवणूकदार, उद्योजक किंवा मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरला येण्यासाठी विमानसेवेवर विश्वास ठेवता येत नसेल, तर शहरात नवीन गुंतवणूक आणणे कठीण होईल, असा मुद्दा मंचाने उपस्थित केला.
सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारणे, नवीन उद्योग आणणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत चर्चा सुरू असताना शहराची विमानसेवा मात्र अनिश्चित राहणे हा मोठा विरोधाभास असल्याचेही मंचाने नमूद केले.
“सोलापूरमध्ये आयटी पार्क, नवीन उद्योग, स्टार्टअप्स आणि रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील, तर मुंबई, हैदराबाद, गोवा, तिरुपती तसेच देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांशी नियमित आणि विश्वासार्ह हवाई संपर्क असणे अत्यावश्यक आहे. विमानसेवा कधी सुरू, कधी बंद आणि कधी रद्द अशा पद्धतीने चालणार असेल, तर मोठा गुंतवणूकदार सोलापूरकडे का पाहील?” असा सवाल सोलापूर विकास मंचाने केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड