
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २४९-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र मतदारांनी स्वतःचे तसेच कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची तपासणी करून आवश्यक असल्यास दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्रमांक १ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारूप मतदार यादी मतदारांच्या पाहणीसाठी संबंधित सर्व मतदान केंद्रे, सोलापूर तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांनी यादीमध्ये नाव, पत्ता, वय, लिंग, मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) आणि मतदान केंद्राची माहिती तपासावी. नावामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा पात्र असूनही नाव मतदार यादीत समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यात अर्ज करून दुरुस्ती अथवा नाव समाविष्ट करण्याची कार्यवाही करता येणार आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत अर्ज सादर करता येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड