
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। यंदाचा गणेशोत्सव सोलापूर शहरात डीजेमुक्त पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शांतता समितीच्या बैठकीत शहरातील नऊ मध्यवर्ती गणेश मंडळांनी या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये यंदा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळणार नाही.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, सोलापूर शहरात १३ ते २६ सप्टेंबरदरम्यान डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, १४, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्ये आणि साधे ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
गणेशोत्सव शांततेत, पारंपरिक पद्धतीने आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नऊ मध्यवर्ती गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सवाला पाठिंबा दिल्याने यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड