
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नावाची काही काळापूर्वी विधान परिषदेसाठीही जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यपदासाठी ते इच्छुक आहेत की पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत अन्य कोणता निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हाभरातील राजकीय संपर्क आणि पक्ष संघटनेतील सक्रिय भूमिका पाहता उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा होणे स्वाभाविक मानले जात आहे. दुसरीकडे, काका साठे यांचेही जिल्हा परिषदेतील माजी अध्यक्ष म्हणून असलेले राजकीय वजन लक्षात घेता त्यांच्या नावाची चर्चा होत आहे.
मात्र, स्वीकृत सदस्यपदासाठी कोणाला संधी द्यायची, याचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे ‘वडाळा की नरखेड?’ या प्रश्नाचे उत्तर पक्षाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळासह गावागावातील कट्ट्यांवर चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला स्वीकृत सदस्याची एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या जागेसाठी पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसल्याने इच्छुकांच्या नावांवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड