
सोलापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या व्ही. बी. रामजी योजनेच्या अंमलबजावणीत भूमिहीन मजूर, गरजू जॉब कार्डधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी तातडीने दूर करून ग्रामीण जनतेला योजनेचा प्रभावी लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी अनिल सावंत यांनी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
१ जुलैपासून योजनेत बदल करून नवीन योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भूमिहीन व गरजू मजुरांना मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ज्या जॉब कार्डधारकांच्या कार्डवर काम मंजूर आहे, त्यांनाच प्रत्यक्ष काम मिळत असल्याचे चित्र असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
पात्र मजुरांची नावे हजेरीपत्रकावर नोंदविली जात नसल्याने अनेक मजूर रोजगाराच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे. सध्या तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला तातडीने काम मिळणे आवश्यक आहे.
त्यासाठी मनरेगा अंतर्गत विहिरी, फळबाग लागवड, शेतरस्ते, शेततळे, जलसंधारण आणि पाणी संवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर करून ती तातडीने सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पात्र मजुरांना रोजगार मिळेल आणि गरजू शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळेल, यासाठी यंत्रणेने प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड