
भोपाळ, 06 सप्टेंबर (हिं.स.)। मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बंडा तहसील अंतर्गत आसपासच्या काही गावांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी सर्वांना बंडा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
सागर कलेक्टर प्रतिभा पाल, एसपी अनुराग सुजानिया यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि पीडित कुटुंबीयांकडून माहिती घेत आहेत.
कलेक्टर प्रतिभा पाल यांनी लोकांना आवाहन केले आहे की, गेल्या २४ ते ४८ तासांत कोणत्याही प्रकारची दारू प्यायली असेल किंवा विषारी दारूची लक्षणे दिसत असतील तर तातडीने स्क्रीनिंग करून घ्यावे. त्यांनी सांगितले की, लोक स्थानिक डॉक्टरांच्या टीमशी संपर्क साधू शकतात किंवा थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून तपासणी करून घेऊ शकतात.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये गोलू उर्फ चमन लोधी (४५), रहिवासी गूगरा खुर्द, दिग्विजय लोधी (२८), रहिवासी नौराज, करतार सिंह लोधी (३०), रहिवासी नौराज, उजियार सिंह लोधी (५६), रहिवासी गूगरा खुर्द, रोशन लोधी (३०), रहिवासी पाटन थाना विनायका आणि राजेंद्र लोधी (३२), रहिवासी नौराज-गूगरा यांचा समावेश आहे. गोलू उर्फ चमन यांना यापूर्वीपासून कॅन्सरची तक्रार असल्याची माहितीही समोर आली आहे.
पाच रुग्ण बीएमसी सागर येथे रेफर
हरनाम राय (४२), रहिवासी चौका, उत्तम नत्थू नायक (४२), रहिवासी दलपतपूर, मंगल रजक (४०), रहिवासी गूगरा खुर्द, परम आदिवासी, रहिवासी हिनौता आणि धनसिंह आदिवासी (३०), रहिवासी हिनौता यांना गंभीर अवस्थेत बीएमसी सागर येथे रेफर करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बंडा येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक सूत्रे आणि ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार, या दुर्घटनेमागे उत्पादन शुल्क विभागाचा घोर निष्काळजीपणा समोर येत आहे. नुकतेच शहरातील एका परवानाधारक दारू ठेकेदाराने उत्पादन शुल्क कार्यालयात बनावट आणि अवैध दारू विकली जात असल्याची तक्रार केली होती. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही परवानाधारक ठेकेदारांनी अवैध दारूच्या व्यवसायाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. असे असूनही विभागाने वेळीच कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ज्याची किंमत ६ निष्पाप ग्रामस्थांना आपला जीव गमावून चुकवावी लागली, असा आरोप करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule