डॉ. विनय प्रकाश सिंग यांची आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या महासचिवपदी सलग दुसऱ्यांदा पुनर्निवड
नवी दिल्ली, 06 सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय डाक सेवेतील 1988 च्या तुकडीचे अधिकारी डॉ. विनय प्रकाश सिंह यांची आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या महासचिवपदी सलग दुसऱ्यांदा चार वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्निवड झाली आहे. 4 सप्टेंबर 2026 रोजी बँकॉक येथे झालेल्
डॉ. विनय प्रकाश सिंग


नवी दिल्ली, 06 सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय डाक सेवेतील 1988 च्या तुकडीचे अधिकारी डॉ. विनय प्रकाश सिंह यांची आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या महासचिवपदी सलग दुसऱ्यांदा चार वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्निवड झाली आहे. 4 सप्टेंबर 2026 रोजी बँकॉक येथे झालेल्या एपीपीयूच्या 14 व्या काँग्रेसमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या पुनर्निवडमुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील टपाल प्रशासनांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि सहमती दिसून येते. आंतरराष्ट्रीय टपाल सहकार्यात भारताच्या योगदानाची ही महत्त्वपूर्ण दखल आहे. त्यांचा दुसरा कार्यकाळ जानेवारी 2027 मध्ये सुरू होईल आणि डिसेंबर 2030 पर्यंत राहील.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रात टपाल सहकार्य बळकट करण्यात एपीपीयूची महत्त्वाची भूमिका सुरू असतानाच ही पुनर्निवड झाली आहे. बँकॉक येथे मुख्यालय असलेली ही संस्था 32 सदस्य देशांची एक आंतरसरकारी संघटना असून, ती संयुक्त राष्ट्रांची टपाल क्षेत्रासाठीची विशेष संस्था असलेल्या जागतिक टपाल संघटनेची प्रादेशिक संस्था म्हणून कार्य करते. 2022 मधील 13 व्या एपीपीयू काँग्रेसमधील पहिल्या निवडीनंतर जानेवारी 2023 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, डॉ. सिंग यांनी टपाल प्रशासनांमधील सहकार्य वाढवण्यात आणि या क्षेत्रातील टपाल सेवांचा विकास व आधुनिकता घडवून आणण्यात योगदान दिले आहे. त्यांच्या या दुसऱ्या कार्यकाळामुळे प्रादेशिक सहकार्य अधिक बळकट करण्याची आणि टपाल क्षेत्रातील सामायिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याची अधिक संधी मिळणार आहे.

तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत डॉ. सिंह यांनी भारत सरकारमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. यामध्ये टपाल सेवा मंडळाचे सदस्य, टपाल विभागातील वरिष्ठ अतिरिक्त महासंचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी, उत्तर प्रदेश टपाल परिमंडळाचे पोस्टमास्टर जनरल तसेच इंडिया पोस्ट मुख्यालयातील मुख्य महाव्यवस्थापक या पदांचा समावेश आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम तसेच लष्करी टपाल सेवा दल येथेही विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. अलाहाबाद विद्यापीठातून आधुनिक इतिहास विषयात त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले असून, भारतीय तंत्रज्ञान संस्थान, दिल्ली येथून व्यवस्थापन विषयात पीएच.डी. केलेली आहे.

डॉ. विनय प्रकाश सिंह यांच्या पुनर्निवडीबद्दल टपाल विभागाने त्यांचे अभिनंदन केले असून, आशिया-पॅसिफिक टपाल संघाचे महासचिव म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ यशस्वी आणि प्रभावी ठरो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande