
अमरावती, 06 सप्टेंबर (हिं.स.)।
ग्राहकांची संख्या कमी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर राजुराबाजार येथे काल भरलेल्या पोळा बाजारात बैल सजावटीच्या साहित्याची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. विविध प्रकारचे गोंडे, झुली, दोर, घंटा, शिंगांना लावण्याचे रंग आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. या साहित्य विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी असताना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी असल्याचे चित्र दिसून आले. पोळा हा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना आकर्षक पद्धतीने सजविण्याची परंपरा आहे. त्यामुळे पोळ्याच्या काही दिवस आधीपासूनच बाजारात बैल सजावटीच्या साहित्याला मागणी वाढते. यंदाही व्यापाऱ्यांनी चांगली विक्री होईल, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात साहित्य आणले आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे ग्राहकांची गर्दी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बाजारात विविध रंगांचे गोंडे, आकर्षक झुली, बैलांच्या गळ्यातील घंटा, दोर, शिंगांना लावण्यासाठी रंग, सजावटीच्या वस्तू तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील अनेक छोटे-मोठे व्यापारी माल घेऊन राजुराबाजारात दाखल झाले आहेत. मात्र ग्राहकांची संख्या कमी असल्याने विक्रीवर परिणाम झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतीमालाचे दर, वाढता उत्पादन खर्च आणि दैनंदिन गरजांवरील वाढता खर्च, यामुळे सणासुदीच्या खरेदीवरही परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आवश्यक वस्तूंच्या खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. बैल सजावटीची परंपरा कायम असली तरी खर्चाचा विचार करून काही शेतकरी मर्यादित प्रमाणात साहित्य खरेदी करीत असल्याचे बाजारातील चित्र आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी