अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी ५०.४० कोटींचा निधी मंजूर
बीड, 06 सप्टेंबर (हिं.स.)। बीड-परळी वैजनाथ या बहुप्रतीक्षित नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्याच्या आर्थिक सहभागातून 50.40 कोटींचा निधी मंजूर करून तो म
रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारचा निधी


बीड, 06 सप्टेंबर (हिं.स.)। बीड-परळी वैजनाथ या बहुप्रतीक्षित नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्याच्या आर्थिक सहभागातून 50.40 कोटींचा निधी मंजूर करून तो मध्य रेल्वेला वितरित करण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना आर्थिक बळ मिळणार असून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे झोनल सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी काही महिन्यांपूर्वी बीड व वडवणी रेल्वे स्थानकांना भेट देऊन स्थानिक रेल्वे समितीचे सदस्य, प्रवासी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यावेळी स्थानिक समितीच्या सदस्यांनी बीडमधून मेमू रेल्वे सेवा सुरू करावी, मुंबईशी रेल्वे संपर्क अधिक सक्षम करावा तसेच प्रवाशांच्या विविध सुविधा सुधाराव्यात, यासह अनेक मागण्यांचे निवेदन डॉ. पतकराव यांच्याकडे सादर केले होते. या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करताना डॉ. पतकराव यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, मध्य रेल्वे झेडआरयूसीसीचे सचिव कुश किशोर मिश्रा तसेच पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश वर्मा यांच्याशी चर्चा करून बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न आणि अहमदनगर बीड-परळी प्रकल्पाला आवश्यक आर्थिक गती याबाबत भूमिका मांडली.

२६१ किमीचा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ हा सुमारे २६१ किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्प आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या प्रकल्पातील सुमारे २०१ किलोमीटरचा अहिल्यानगर-बीड-वडवणी विभाग सुरू झाला असून उर्वरित भागाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पासाठी आवश्यक बहुतांश जमीन संपादन पूर्ण झाले असून प्रमुख पूल तसेच रेल्वे उड्डाणपुलांची कामेही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. रेल्वे मंत्रालयाने जुलै आणि ऑगस्ट 2026 मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, हा महाराष्ट्रातील सुरू असलेल्या प्रमुख रेल्वे प्रकल्पांपैकी एक असून प्रकल्पाची अद्ययावत अंदाजित किंमत सुमारे 5,800 कोटी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande