
परभणी, 06 सप्टेंबर (हिं.स.)। संध्याकाळचे लोडशेडिंग रद्द करून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यावा तसेच दुष्काळग्रस्त पिके वाचवण्यासाठी किमान आठ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, या मागण्यांसाठी खळी, ता. गंगाखेड येथे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते १० या वेळेत होणारे लोडशेडिंग रद्द करावे, गावठाणची सिंगलफेस वीज सुरू करावी, पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त वीज द्यावी, चुकीची वीजबिले दुरुस्त करावीत तसेच स्मार्ट मीटर रद्द करावेत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. ओंकार पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश पवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महावितरणचे सहाय्यक अभियंता चाकोले यांनी दहा दिवसांत सिंगलफेस वीज सुरू करण्याचे तसेच रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शेतीपंपांसाठी तीन फेज वीजपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis