
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी आणि अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
अक्कलकोट तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच तालुक्यातील परिस्थितीचा विचार करून अक्कलकोटला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी युवा सेना नेते मुकेश दादा कांबळे, पंचायत समिती सदस्य भीमा सोलापूरे, मारुती काळे, पंचायत समिती गण तोळणूर सोशल मीडिया प्रमुख व युवा नेते सुभाष हंद्राळ, युवा नेते शिवलिंग वग्गे आदी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सिद्धाराम म्हेत्रे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड