
नाशिक, 06 सप्टेंबर (हिं.स.)।
: सातपूर परिसरातील ‘आण्णाचा मळा’ येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-२ ने धाड टाकत रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन आणि चारचाकी वाहने असा एकूण ८६ लाख ७८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी शहरातील अवैध धंदे व जुगार अड्ड्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी व कर्मचारी अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोउनि संजय सानप आणि पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त माहिती मिळाली.
सातपूरमधील बजरंग नगर परिसरातील ‘आण्णाचा मळा’ या बंद हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये ‘तीन पत्ती’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. या कारवाईत सचिन आण्णासाहेब गांगुर्डे (वय ३९, सातपूर) आणि अनिल दत्ता शेवाळ (वय ४२, सातपूरगाव) हे जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले. तसेच तेथे जुगार खेळणारे आणि खेळवणारे मिळून एकूण ४९ जणांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन, वाहने असा एकूण ८६ लाख ७८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हे शाखा युनिट-२ चे पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI