भारतापेक्षा बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वातून पंजाबला अधिक धोका- मरियम नवाज
इस्लामाबाद , 06 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानी लष्कर आपल्या देशात होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा खोटा आरोप नेहमीच भारत आणि अफगाणिस्तानवर करत आले आहे. मात्र, आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज य
भारतापेक्षा बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वातून पंजाबला अधिक धोका- मरियम नवाज


इस्लामाबाद , 06 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानी लष्कर आपल्या देशात होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा खोटा आरोप नेहमीच भारत आणि अफगाणिस्तानवर करत आले आहे. मात्र, आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी लाहोरमध्ये एआय हबच्या उद्घाटनावेळी मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला शेजारी देश भारतापासून जितका धोका आहे, त्यापेक्षा पाकिस्तानमधीलच शेजारी प्रांत असलेल्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधून अधिक धोका आहे. याच प्रांतांमधून पंजाबमध्ये दहशतवाद येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंजाब प्रांतातील दहशतवाद आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रोव्हिशनल इंटेलिजन्स फ्युजन अँड थ्रेट अससेसमेंट सेंटर (पीआयएफटीएएस) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हब यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मरियम नवाज यांनी दावा केला की, त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पंजाब प्रांतातील गुन्हेगारीचे प्रमाण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तसेच पीआयएफटीएएस आणि एआय हबच्या माध्यमातून संभाव्य धोक्यांची आधीच माहिती मिळण्यास मदत होईल, सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक चांगला होईल आणि नव्या आव्हानांवर वेळीच कारवाई करता येईल, असा दावा त्यांनी केला.

एका बाजूला मरियम नवाज यांनी पीआयएफटीएएस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हबच्या उद्घाटनावेळी हे स्पष्ट केले की, पाकिस्तानमधील दहशतवाद ही पाकिस्तानचीच समस्या आहे. पाकिस्तानला भारताकडून नव्हे, तर बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांकडून अधिक धोका असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानचा पंजाब प्रांत आजही भारतविरोधी दहशतवादाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांचे प्रमुख आजही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वास्तव्यास असल्याचा दावा केला जातो. तसेच भारताविरोधात आयएसआयच्या कथित पाठिंब्याने चालणाऱ्या गुंडांच्या नेटवर्कचे केंद्रही पाकिस्तानचा पंजाब प्रांत असल्याचे सांगितले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande