रत्नागिरी : गणेशोत्सव मंडळांशी पोलीस अधीक्षकांची समन्वयक चर्चा
रत्नागिरी, 6 सप्टेंबर (हिं.स.) । आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत साजरा व्हावा, यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सम
रत्नागिरी : गणेशोत्सव मंडळांशी पोलीस अधीक्षकांची समन्वयक चर्चा


रत्नागिरी, 6 सप्टेंबर (हिं.स.) । आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत साजरा व्हावा, यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अरांक्षा यादव, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजित थोरात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी पोलीस अधीक्षकांनी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. मंडळांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा करून संबंधित समस्यांचे योग्य ते निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीदरम्यान गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळांनी शासन, प्रशासन व न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन, वाहतूक व्यवस्थेस अडथळा होणार नाही याची दक्षता, मंडप व विद्युत व्यवस्थेतील सुरक्षितता, अग्निसुरक्षा उपाययोजना, सार्वजनिक स्वच्छता तसेच सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पोलीस दल व सार्वजनिक गणेश मंडळे यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून कोणत्याही संभाव्य अडचणींचे वेळीच निराकरण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande