शफाली वर्मा ठरली ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू
दुबई, 06 सप्टेंबर (हिं.स.)भारताची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने इतिहास रचला. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारी ती जगातील सर्वात जलद आणि सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे. शफाली हा टप्पा गाठण्यासाठी दुबईत पाकिस
शफाली वर्मा


दुबई, 06 सप्टेंबर (हिं.स.)भारताची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने इतिहास रचला. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारी ती जगातील सर्वात जलद आणि सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे.

शफाली हा टप्पा गाठण्यासाठी दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या 'महिला आशिया कप २०२६' (गट अ) सामन्यात ७ धावांची गरज होती. तिने अजिबात वेळ न घालवता भारताच्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर सात धावा करत हा विक्रम पूर्ण केला. सामन्यातील चेंडूंचा विचार करता, ३,००० धावांचा टप्पा सर्वात जलद गाठण्याचा विक्रमही तिच्या नावावर जमा झाला आहे. तिने केवळ २,१८२ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली.

शफालीपूर्वी, महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा करणारी सर्वात जलद खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा हिलीचे नाव होते. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या हिलीच्या नावावर सर्वात कमी चेंडूंत हा टप्पा गाठण्याचा विक्रम होता.शफालीने वयाच्या अवघ्या २२ वर्षे आणि २२० दिवस इतक्या कमी वयात हा टप्पा गाठला आणि ती ही कामगिरी करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली.

२०१९ मध्ये भारतासाठी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शेफालीने आता हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्यानंतर 'वुमेन इन ब्लू' (भारतीय महिला संघ) साठी या प्रकारात ३,००० धावांचा टप्पा गाठणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या टी-२० आशिया कपच्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर आपले वर्चस्व गाजवत सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत गुंडाळल्यानंतर, भारताने केवळ ८.४ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले. यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर (१८) आणि दीप्ती शर्मा (१२) नाबाद राहिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande