
नाशिक, 06 सप्टेंबर (हिं.स.)।
:महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर निर्णायक चर्चा करून आगामी काळातील समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सकल मराठा समाजाची निमंत्रित राज्यस्तरीय बैठक आता मुंबईऐवजी नाशिक येथे होणार आहे.मुंबई येथे काही कारणास्तव सभागृह उपलब्ध न झाल्याने तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व समाजबांधवांशी चर्चा केल्यानंतर बैठक नाशिक येथे घेण्याबाबत एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.८सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर, मुंबई नाका येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजासाठी काम करणाऱ्या प्रमुख समाजबांधवांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आले असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजाला महायुती सरकारने SEBC अंतर्गत दिलेले १० टक्के आरक्षण सध्या न्यायप्रविष्ट आहे.या आरक्षणाला भविष्यात घटनात्मक संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने कोणत्या ठोस आणि कायदेशीर उपाययोजना कराव्यात,यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा विस्तार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी,प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजासाठी वसतिगृहांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक व आर्थिक सवलती तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान समाजबांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे या विषयांवरही समाजाची भूमिका निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे.
राज्यस्तरीय बैठक यशस्वी करण्यासाठी नाशिकमध्ये पूर्वनियोजनाची बैठक घेण्यात आली.मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत राज्यातील समाजबांधवांसमोर मांडण्यात येणारे विविध प्रश्न,त्यावरील चर्चा,नियोजन,उपस्थिती तसेच बैठकीच्या अंतिम तयारीचा आढावा घेण्यात आला.
सर्व जिल्ह्यांतील समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मराठा समाजाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता एकत्रित आणि ठोस भूमिका निश्चित करण्यासाठी ही राज्यस्तरीय बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून काम करणाऱ्या समन्वयकांनी,पदाधिकाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी दि.८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कालिका माता मंदिर सभागृह,मुंबई नाका,नाशिक येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI