
- न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश- विद्यमान न्यायमूर्ती रवींद्र घुगे कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश- मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीसाठी नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागणार
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारसीनुसार शनिवारी देशभरातील आठ उच्च न्यायालयांमध्ये नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक्स'वर एका पोस्टद्वारे या नियुक्त्यांची घोषणा केली.
यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आता कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. यासोबतच छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिकडे ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम महापात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अल्पेश यशवंत कोगजे यांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात जवळपास १३ वर्षे कार्यरत असलेले न्यायमूर्ती घुगे यांची या वर्षी जूनमध्ये प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती घुगे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही. बी. घुगे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी कोल्हापूर येथील सेंट झेवियर्स शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९९० मध्ये कोल्हापूरच्या शहाजी विधी महाविद्यालय आणि औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) येथील एमपी विधी महाविद्यालयातून कायद्याची पाच वर्षांची पदवी प्राप्त केली होती.
न्यायमर्ती त्रिपाठी हे सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींनंतरचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचे कामकाज पाहिले आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी १९९० मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ जानेवारी १९९२ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी दिवाणी प्रकरणे प्रामुख्याने लढवली आहेत आणि ऑक्टोबर २००७ पासून उत्तर प्रदेशचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर, २७ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि १० एप्रिल २०१५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून काम पाहत होते.
न्यायमूर्ती घुगे यांच्या बदली संदर्भातील निर्णयामुळे मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण सुनावणीसाठी आता नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागणार आहे. न्यायमूर्ती घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सध्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याबाबत गेले वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होते. परिणामी न्यायमूर्ती घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस झाल्याने प्रकरणासाठी आता नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागेल आणि प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी लागेल. याचिकाकर्त्यांसह आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सध्या राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरू होता.
राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्याबाबत अलीकडेच वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी त्यांच्यावर गंभीर आणि अभूतपूर्व आरोप केले होते. दरम्यान, न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी