सोलापूर : आपत्कालीन भारनियमन टाळा; वीज कपातीपूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्या - पालकमंत्री गोरे
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने भारनियमनाचे योग्य नियोजन करावे. वीजपुरवठा खंडित करणे अपरिहार्य असल्यास ग्राहकांना पूर्वसूचना दे
Jay Kumar gore


सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने भारनियमनाचे योग्य नियोजन करावे. वीजपुरवठा खंडित करणे अपरिहार्य असल्यास ग्राहकांना पूर्वसूचना देण्याची प्रभावी व्यवस्था करावी, तसेच आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील भारनियमनाबाबत प्राप्त होत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी शुक्रवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती दिली. मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले. यावर पालकमंत्री गोरे यांनी नाराजी व्यक्त केली.अचानक होणाऱ्या वीज कपातीमुळे विशेषतः कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश गोरे यांनी दिले.

भारनियमन करणे अपरिहार्य असल्यास त्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळेल, अशी प्रभावी व्यवस्था उभारावी. भारनियमनाचा कालावधी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यामागील कारणांची स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत ग्राहकांनी दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष कार्यालयात विचारणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सौहार्दपूर्ण आणि समाधानकारक पद्धतीने उत्तर द्यावे. नागरिकांशी उद्धटपणे अथवा चुकीच्या पद्धतीने संवाद साधू नये. भारनियमनाचा कालावधी, त्यामागील कारणे आणि वीजपुरवठा पूर्ववत होण्याबाबतची उपलब्ध माहिती ग्राहकांना स्पष्टपणे द्यावी, असेही पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणाचीही बैठकीत चर्चा झाली. या विधानाबाबत पालकमंत्री गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande