
पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह परिसरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सातत्याने प्रलंबित राहिल्याने रविवारी आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘स्मार्ट आयटी सिटी’ संकल्पनेअंतर्गत काढण्यात आलेला मूक मोर्चा सध्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुरू असून, या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना पाठिंबा दिला.
हिंजवडीतील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनामुळे हिंजवडीतील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सरकार या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेईल, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. या आंदोलनात स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन माण, हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन आणि मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.
मोर्चाची सुरुवात हिंजवडीतील इन्फोसिस सर्कल येथून झाली. त्यानंतर मोर्चा शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस सर्कल चौकात येणार असून, तेथे आंदोलनाची सांगता होणार आहे. आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू असून, आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी येत असताना परिसरातील पायाभूत सुविधांवर निर्माण झालेला ताण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु