
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। भगवान शिव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्यात विलक्षण साम्य आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांवर भगवान शिवाची देवालये असणे, ही त्यांच्या श्रद्धेसोबतच लोककल्याणकारी वृत्तीचीही साक्ष देणारी बाब आहे. रयतेच्या राज्याचे रक्षण करणाऱ्या छत्रपतींच्या कार्याची महती इतकी व्यापक आहे की, तमिळनाडूतील मंदिराच्या गोपुरावरही त्यांची प्रतिमा कोरण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते व विचारवंत डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
पवित्र श्रावणमासानिमित्त डॉ. मेतन फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने माचनूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित ‘शिव ते शिव’ या व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या व्याख्यानाला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता उत्तम विचार, संस्कार, ध्येयवाद आणि कठोर शिस्त आत्मसात करावी. समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासत जीवनात सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.श्री सिद्धेश्वरांनी आपल्या काळात उभारलेले सामाजिक कार्य आणि त्यांचा व्यापक दृष्टिकोन आजही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे डॉ. शेटे यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड