
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)।आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी महापालिकेच्या मालकीच्या आठ मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती विक्रेत्यांकडून वाढलेली मागणी लक्षात घेऊन जागांची संख्या वाढविण्यात आली आहे.दरम्यान, मूर्तीकारांसाठीही प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक, गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मूर्ती विक्रेत्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रस्त्यांच्या कडेला किंवा अनधिकृत ठिकाणी मूर्ती विक्री करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.यंदा विक्रेत्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिकेने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक जागा उपलब्ध करून दिल्याने गणेशमूर्ती विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्याचबरोबर सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने मूर्तीकार आणि गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात पर्यावरणीय नियमांचे पालन करत विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड