
वॉशिंग्टन , 07 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी अमेझॉनचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरून बाहेर गेले आणि या विमानाने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर त्याला आग लागली. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अन्य दोन जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मियामीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता धावपट्टीवरून बाहेर गेले. मृत्यू झालेल्या व्यक्ती विमानातील प्रवासी होत्या की विमानाने धडक दिलेल्या वाहनांमध्ये होत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे विमान पोर्तो रिकोच्या सॅन जुआन येथून मियामीला पोहोचले होते. दुर्घटनेनंतर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले.
मियामी-डेड रेस्क्यू फायरचे प्रमुख रे जदल्लाह यांनी सांगितले की, विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट आणि सहपायलट अडकले होते. काही जण कारमध्येही अडकले होते. तर आणखी एक व्यक्ती वाहनाखाली दबली होती. दुर्घटनेनंतर मियामी विमानतळावरील अनेक उड्डाणे काही तासांसाठी थांबवण्यात आली. विमानातून इंधनाची गळतीही होत होती. दुर्घटनेनंतर अनेक तास अग्निशमन दलाचे जवान ही गळती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
अपघातानंतर प्राइम एअरचे विमान रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले. तेथे दोन मोठे ट्रकही उभे होते. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये विमान पोटाच्या भागावर पडलेले दिसत होते. आग लागूनही विमानाचा बहुतांश भाग सुरक्षित राहिला. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्या माहितीनुसार, रविवारी दुपारनंतर विमानतळावरील सुमारे २५० उड्डाणांना विलंब झाला.
हे विमान ३२ वर्षे जुने बोईंग ७६७ होते. सुरुवातीला या विमानाची निर्मिती प्रवासी वाहतुकीसाठी करण्यात आली होती. दोन दशकांहून अधिक काळ ते अनेक विमान कंपन्यांसाठी प्रवासी विमान म्हणून कार्यरत होते. २०१५ मध्ये त्याचे रूपांतर मालवाहू विमानात करण्यात आले. ही उड्डाणसेवा उत्तर कॅरोलिनास्थित कार्गो कंपनी २१ एअरने चालवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode