
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर (हिं.स.) दिल्लीतील सत्य निकेतन पेइंग गेस्ट (पीजी) दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. पी-१४ नावाने ओळखली जाणारी ही इमारत कोसळली होती. एनडीआरएफ, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांची पथके ढिगारा हटवत आहेत. ढिगाऱ्याखालून दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे राजधानीच्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये पीजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या इमारतींची सुरक्षितता आणि बांधकाम व अग्निसुरक्षा नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पी-१४ ही इमारत १९९० च्या दशकात बांधली गेली असल्याचे सांगितले जाते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
दिल्ली सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कथित मालक हरी राम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी दक्षिण कॅम्पसमधील श्री व्यंकटेश्वर कॉलेजसमोरील सत्य निकेतन या निवासी वसाहतीत घडली.
नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, त्यांनी दिल्ली पोलीस, दिल्ली अग्निशमन दल आणि डीडीएमए यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांना मदत आणि बचाव कार्यात समन्वय साधून त्याला गती देण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मंत्री कपिल मिश्रा, महापौर परवेश वाही, खासदार बासुरी स्वराज आणि आमदार अनिल शर्मा हे मुख्यमंत्र्यांसोबत घटनास्थळी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी फोनवर संवाद साधून परिस्थितीची विचारपूस केली. त्यांनी दिल्ली सरकारला आरोग्य मंत्रालयाकडून सर्व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी नवी दिल्लीतील एम्स आणि दिल्लीतील केंद्र सरकारच्या रुग्णालयांच्या संचालकांना जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे