पक्ष सोडून गेलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेत; महिलांचा मोठ्या संख्येने प्रवेश
डोंबिवली, ७ सप्टेंबर (हिं.स.) : पक्ष सोडून गेलेले काही कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) परतले असून, रविवारी पलावा, लोढा हेवन येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनीही मनसेत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राज
Ph01


डोंबिवली, ७ सप्टेंबर (हिं.स.) : पक्ष सोडून गेलेले काही कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) परतले असून, रविवारी पलावा, लोढा हेवन येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनीही मनसेत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना राजकीय संघर्षात संयम बाळगण्याचा सल्ला देत, विरोधकांकडून भांडणासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला.

समोरच्या पक्षांना वाटतं की आपण या लोकांशी भांडायला पाहिजे. पण ते भांडण गरजेचं नाही. हा आपल्यासाठी ट्रॅप आहे, असा संदेश राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्षात पुन्हा परतलेल्या कार्यकर्त्यांविषयी बोलताना पाटील यांनी सांगितले की, काही कार्यकर्ते तिकीट, मानपान किंवा पक्षातील कार्यपद्धतीबाबत नाराज होऊन पक्षापासून दूर गेले होते. मात्र, मनसे हा एक परिवार असून, नाराजीनंतर दूर गेलेले कार्यकर्ते पुन्हा पक्षात परतत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महिलांच्या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशाचे स्वागत करताना पाटील यांनी मनसेमध्ये महिलांना सन्मानाचे स्थान असल्याचे सांगितले. तसेच नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण उघडपणे प्रवेश करतोय. मी तुमचा भाऊ आहे आणि तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे घाबरायची काय गरज नाही, असे पाटील म्हणाले. महिला कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या काही व्यक्तींशी असलेल्या जुन्या संबंधांचाही पाटील यांनी उल्लेख केला. हे कार्यकर्ते पूर्वी मनसे परिवाराचा भाग होते आणि पक्षाच्या पलीकडेही त्यांच्याशी संबंध होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, पक्ष सोडल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.

आमच्या लोकांना हात नका लावू, अशी आपण वारंवार विनंती केली होती, असे सांगताना पाटील यांनी, “असं वागू नका, आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आहेत तेवढे संबंध तरी ठेवा, असा इशाराही दिला.

मराठी-अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मराठी-अमराठी वादावर भाष्य करताना पाटील यांनी या मतदारसंघात असा कोणताही वाद नसल्याचे सांगितले. उलट, हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

या मतदारसंघातील सुमारे ५० ते ६० टक्के नागरिक अमराठी असून, त्यांनी मनसेच्या उमेदवारांना दोन वेळा निवडून दिल्याचे पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे मतदारसंघात मराठी-अमराठी असा संघर्ष असल्याचे चित्र निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

एसआयआरमुळे मतदारसंख्येत घट झाल्याचा दावा

एसआयआरचा उल्लेख करताना पाटील यांनी मतदारयादीतून सुमारे २ लाख ५५ हजार मतदार कमी झाल्याचा दावा केला. यामध्ये स्थलांतरित, मृत तसेच ट्रेसिबल नसलेल्या मतदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील निवडणुकीतील मतदान आणि मतदारसंख्येचा संदर्भ देत पाटील यांनी मतदारयादीतील या बदलाबाबत चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande