
ओझर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : आगामी २०२६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार तयारी सुरू असतानाच, ओझर परिसरात बोगस साधूंच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या दोन कथित बोगस नागा साधूंना ओझर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे भंडारा व पूजेच्या नावाखाली दक्षिणा मागण्यासाठी आरोपींपैकी एकजण ओझर येथील मिठाईच्या दुकानात गेला होता. गल्ल्यावर बसलेल्या दुकानदाराच्या हातातील सोन्याची अंगठी त्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर हातचलाखी आणि कथित संमोहनाचा वापर करून दुकानदाराच्या नकळत त्याच्या हातातील अंगठी काढून घेण्यात आल्याचा आरोप आहे.
हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या फुटेजच्या आधारे ओझर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन दोन्ही संशयित आरोपींना अटक केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात साधू-संत तसेच भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस साधूंच्या माध्यमातून भाविक व नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI