
मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.)। अँकर कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या प्रतिष्ठित ‘अँकर ओरल केअर’ या ब्रँडने इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू, विश्वचषक विजेता कर्णधार आणि टी-२० क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज जोस बटलर याची भारतातील ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. अँकरच्या भारतातील विस्ताराच्या दृष्टीने ही भागीदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारत ही कंपनीच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असून, देशातील ग्राहकांशी अधिक दृढ आणि आत्मीय नाते निर्माण करण्यासाठी कंपनीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
जोस बटलरसोबतची भागीदारी ही अँकर ओरल केअरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबतची पहिलीच भागीदारी आहे. आयपीएलमधील आपल्या दमदार कामगिरीमुळे बटलरने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणि अँकरचा विश्वास व गुणवत्तेचा वारसा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून करण्यात आला आहे. तरुण ग्राहक आणि भारतीय कुटुंबांपर्यंत पोहोच वाढवण्यास या भागीदारीची मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
अँकर कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे संचालक करण शहा यांनी सांगितले की, ३० हून अधिक देशांमध्ये अँकर ओरल केअरची उपस्थिती आहे. भारत ही कंपनीची मूळ बाजारपेठ असून, येथे ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी उत्कृष्टता, नेतृत्व आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची गरज होती. जोस बटलरचा उल्लेखनीय प्रवास आणि जागतिक ओळख यामुळे तो अँकरसाठी योग्य ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
क्रिएटिव्ह डायरेक्टर कुणाल शाह यांनी बटलरमध्ये कामगिरी, आत्मविश्वास, संयम आणि व्यक्तिमत्त्वाचा अनोखा संगम असल्याचे सांगितले. तर विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असित रॉय यांनी आयपीएलच्या माध्यमातून बटलरचे भारतीय प्रेक्षकांशी निर्माण झालेले नाते या भागीदारीचे विशेष वैशिष्ट्य असल्याचे म्हटले. मार्केटिंग प्रमुख संदीप अब्भी यांनी गेल्या जवळपास तीन दशकांपासून भारतीय कुटुंबांचा अँकरवर विश्वास असल्याचे सांगत, तरुण आणि व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी बटलरची साथ महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
जोस बटलरनेही अँकर ओरल केअरसारख्या विश्वास, गुणवत्ता आणि दैनंदिन जीवनातील आत्मविश्वास या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रँडसोबत जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त केला. तोंडाच्या स्वच्छतेच्या आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्याच्या अँकरच्या मोहिमेचा भाग होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. अँकरने भारतासह युके, नेपाळ आणि मध्य पूर्वेतील बहुवर्षीय भागीदारीसाठी बटलरशी करार केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule