
छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : शिवसेनेचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दानवे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सविस्तर माहिती घेत त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या मंगळवारपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणस्थळी भेट देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे पोहोचून मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली.
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला महत्त्व असून, त्याचवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका दानवे यांनी यावेळी मांडली.
जरांगे यांच्या बेमूदत उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते उपोषणस्थळी दाखल होत आहेत. दानवे यांच्या भेटीमुळे आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis