
मराठा, कुणबी व एसईबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधींचा दिलासा
छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला असून, सरकारने चार महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांमार्फत चार शासकीय आदेश (जीआर/पत्रे) जारी केले आहेत. या निर्णयांमधून मराठा, कुणबी आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती
तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ईबासा, इडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सारथीच्या परदेशी शिष्यवृत्ती धोरणात सुधारणा
नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणात सुधारणा केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या धोरणानुसार करण्यात आलेल्या या बदलामुळे परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संबंधित संस्थेला अदा केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या लाभाच्या रकमेवरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १,५०० अमेरिकन डॉलर, तर यूकेमधील शिक्षणासाठी १,१०० जीबीपी अतिरिक्त निर्वाह व आकस्मिक भत्ता देण्यात येणार आहे. तसेच QS Ranking वर आधारित नवीन गुणवत्ता यादी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
१,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग व कंडक्टर प्रशिक्षण
सारथी संस्थेने IDTRS, पिंपरी-चिंचवड यांच्याशी सामंजस्य करार करून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांना LMV व HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षण देण्याचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे. हे प्रशिक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
या प्रशिक्षणातून किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेले हे निर्णय प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतात आणि याचा मराठा समाजाच्या मागण्यांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis