जरांगेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत- ओबीसी नेते मंगेश ससाणे
छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला आहे. सरकार ओबीसी समाजाच्या आंदोलनावर पोलिसांचा वापर करत असताना जरांगे यांच्य
जरांगेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत- ओबीसी नेते मंगेश ससाणे


छत्रपती संभाजीनगर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला आहे. सरकार ओबीसी समाजाच्या आंदोलनावर पोलिसांचा वापर करत असताना जरांगे यांच्या आंदोलनाबाबत मात्र वेगळी भूमिका घेत असल्याचा दावा ससाणे यांनी केला.

ससाणे म्हणाले की आज पुन्हा एकदा सरकारचा दुटप्पीपणा समोर आला आहे. स्वतःला ओबीसींच्या डीएनएचे सरकार म्हणवणाऱ्या फडणवीस सरकारने अंतरवाली सराटी येथे ओबीसींचे उपोषण पोलिसांचा वापर करून मोडून काढले. मात्र, याच ठिकाणी मनोज जरांगे गेल्या दहा दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि सरकारमधील मंत्र्यांवर टीका करत आहेत. सरकार पाडण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. असे असतानाही त्यांच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत नाही; मात्र ओबीसींच्या उपोषणामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येते का ?

सरकारच्या या कथित दुहेरी भूमिकेवर टीका करताना ससाणे यांनी फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला. आम्हाला एक न्याय आणि मनोज जरांगेंना वेगळा न्याय, अशी भूमिका सरकार घेत आहे. त्यामुळेच जरांगेंचे आंदोलन आणि उपोषण सरकार पुरस्कृत असल्याचे आज स्पष्ट झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ससाणे म्हणाले की, जरांगे यांना आंदोलन करण्याची आणि सरकारविरोधात भूमिका मांडण्याची मुभा दिली जात आहे, तर ओबीसी समाजाच्या आंदोलकांवर मात्र कारवाई केली जात आहे. ओबीसी समाज हे सर्व पाहत आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. ओबीसींचा मित्र कोण आणि शत्रू कोण, हे सरकारने आज महाराष्ट्राला दाखवून दिले आहे असेही ससाणे यांनी म्हटले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande