एकता टिकवून हिंदुत्व जगविण्याची जबाबदारी सर्वांची - राधाकृष्ण विखे पाटील
नाशिकरोड, 07 सप्टेंबर (हिं.स.)सध्या वेगवेगळे समाजबांधव वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. अशा परिस्थितीत एकता टिकवून हिंदुत्व जगविण्याचे, टिकवण्याचे कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल
It is everyone's responsibility


नाशिकरोड, 07 सप्टेंबर (हिं.स.)सध्या वेगवेगळे समाजबांधव वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. अशा परिस्थितीत एकता टिकवून हिंदुत्व जगविण्याचे, टिकवण्याचे कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. आता आपण आपला वाटा उचलला पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले.

नाशिकरोड येथील जैन स्थानकवासी श्रावक संघातर्फे चातुर्मासानिमित्त राष्ट्रीय कवी स्वयं श्रीवास्तव यांचा कवितांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. प्रारंभी महासती प. पू. विपुल दर्शनाजी म. सा. यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले.

संघपती किरण धाडीवाल, चातुर्मास समिती अध्यक्ष किरण घिया, उपाध्यक्ष विनय भंडारी, सचिव मनीष शहा, खजिनदार संजय सुराणा, उमेश चोपडा, मिठुलाल चोरडिया, सुनिल बेदमुथा, संतोष घिया, नगरसेविका श्वेता भंडारी, दत्ता गायकवाड, तुषार भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. वास्तुविशारद मनीष कांकरिया यांनी संघाला विनामूल्य सेवा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. विखे पाटील म्हणाले की, भारत ही संतांची भूमी आहे. आपण सर्व एक असून भगवंतही एक आहे. या भूमिकेतूनच अध्यात्माचे काम उभे राहिल. मुंबईत नरीमन पॉईन्टला पारशी जिमखाना, हिंदू जिमखाना आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे जैन जिमखाना झाला आहे. किरण घिया म्हणाले की, विखे पाटील परिवार पूर्वीपासूनच जैन समाजाला मदत करत आला आहे. फडणवीस सरकारने मुंबईत गरीब जैन विद्यार्थ्यांसाठी भूखंड उपलब्ध करून दिला. नाशिकमधील सिंचन भवनची जागा जैन विहार भवनकरीता मिळण्यासाठी विखे पाटील यांनी प्रयत्न करावेत. राधाकृष्ण विखे फाऊंडेशनतर्फे नाशिकरोडला प्रथमच महिलांसाठी गरबा घेतला जाणार आहे.

उत्तरप्रदेशातील राष्ट्रीय कवी स्वयं श्रीवास्तव यांनी सुंदर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ते म्हणाले की, महिला यशस्वी होते. कारण महिलांनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पूर्वीपासून संघर्ष केला. ईश्वर प्रतिभा देतो तेव्हा आपण पूर्ण श्रध्देने काम करावे. श्रीवास्तव यांनी त्यांच्या गाजलेल्या कविता सादर केल्या. मुश्कील की थी संभलना पडा घरके वास्ते, फिर घरसे निकलना पडा घर के वास्ते, मजदूरी का नाम हमने शौख रख

दिया, हर शौख बदल ना पडा घर के वास्ते...., ना जीत मे हार के जाने मे मजा है, जीतना की दिलकी आग बुझाने मे मजा है..., पत्थर की चमक है ना नगीने की चमक है, चेहरे पे सिना तानके जीने के चमक है...., प्रेम करने चली तो उसे भी नही जो महेज थी कहानी सुना दी गयी, नर्तकी एक अकबरके दरबारमें कैसे दिवार मै थी चुना दि गयी..., अशा कविता आपल्या वेगळ्या शैलीत सादर करत त्यांनी टाळ्या मिळवल्या.

संयोजक योगेश भंडारी, दीपक कुमट, दिलीप बाफना, प्रेमचंद अलिझाड, विजय चोरडिया, अभय धाडीवाल, महेंद्र धाडीवाल, विजय संकलेचा आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande