
उमेदवारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका
राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
नांदेड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टेनोग्राफर पदाच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उमेदवारांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
स्टेनोग्राफर पदाच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडे यापूर्वी मागण्यांकडे लक्ष वेधून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने काही उमेदवारांनी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार आनंद बोंढारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्या उमेदवारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, मागण्या आणि भरती प्रक्रियेसंदर्भातील भूमिका समजून घेतली.
यावेळी आमदार बोंढारकर यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. उमेदवारांच्या या प्रश्नावर राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करू. आंदोलकांच्या मागण्या सरकारदरबारी मांडून त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार बोंढारकर यांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्या उमेदवारांना आपल्या मागण्यांना शासनस्तरावर पाठबळ मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता राज्य शासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे स्टेनोग्राफर भरतीतील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis