गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेरळमध्ये शांतता समितीची बैठक
रायगड, 07 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी परिसरातील विविध समस्या तसेच आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर
Peace committee meeting held in Neral ahead of Ganeshotsav.


रायगड, 07 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी परिसरातील विविध समस्या तसेच आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरुटे, पोलीस उपनिरीक्षक काजोळकर, नायब तहसीलदार सुहास राऊत, ग्रामसेवक संजय राठोड, अरुण कारले, महावितरणचे दीक्षांत वाघ व सूर्यकांत वाघमारे, जयेद नजे, भगवान चंचे (पंचायत समिती सदस्य) यांच्यासह शांतता समितीचे सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात नेरळ परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः नेरळ टॅक्सी स्टँड आणि रिक्षा नाका परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गणेशोत्सव काळात जड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठरावीक वेळ निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.

वीजपुरवठा सुरळीत राहावा, तसेच रस्त्यालगत खाली आलेल्या वीजवाहिन्या सुरक्षित उंचीवर नेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आवश्यकता असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच डीजे, लेझर लाईट आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या.

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पोलीस चौकी उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सव काळात अफवा किंवा चुकीच्या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande