
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची घेतली भेट
न्याय्य हक्कासाठी ठामपणे सोबत राहण्याची ग्वाही
नांदेड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण समाजासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की, मी आधी मराठा समाजाचा एक घटक आहे. समाजाच्या न्याय्य हक्कासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांच्या या संघर्षाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. समाजहितासाठी सुरू असलेल्या या लढ्यात आपण शेवटपर्यंत समाजासोबत ठामपणे उभे राहू.
यावेळी आमदार चिखलीकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करताना चिखलीकर म्हणाले की, जरांगेंची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. आम्ही त्यांना पाणी घेण्याचा आग्रह केला; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.”
या भेटीप्रसंगी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, लोहा नगरपालिकेचे नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष नेताजीराव भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे लोहा-कंधार परिसरातील मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या भूमिकेमुळे स्थानिक मराठा समाजात आंदोलनाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis