
‘अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका’
नवी दिल्ली, 07 सप्टेंबर (हिं.स.)। डोंबिवली (जि. ठाणे) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “अशा लोकांना मोकळेपणाने रस्त्यावर फिरण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांना स्थानबद्ध करायला हवे,” अशा कठोर शब्दांत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात राज्य सरकारने म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने याचिका मागे घेण्यास परवानगी देत ती फेटाळून लावली. मात्र, राज्य सरकारने म्हात्रे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेची न्यायालयाने दखल घेत त्यांना नोटीस बजावली.
डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना अमानुषपणे मारहाण करणे कसे समर्थनीय ठरू शकते, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. डॉक्टरांवरील हल्ला हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खटला वेगाने चालवला जात असल्याबाबत रोहतगी यांनी आक्षेप घेतला असता, “खटल्याची सुनावणी वेगाने झाली तर त्यात गैर काय?” असा सवाल न्यायालयाने केला. अशा घटनांबाबत समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, सुनावणीवेळी न्यायालयाने पालघरमध्ये नुकत्याच डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. डॉक्टरांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. डॉक्टरांवरील हिंसाचार खपवून घेतला जाऊ नये, असा स्पष्ट संदेश या सुनावणीतून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule