
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)सोलापूरची विमानसेवा वारंवार बंद होणे, विमानफेऱ्या रद्द होणे आणि नवीन विमानसेवांच्या केवळ घोषणा होऊन त्या प्रत्यक्षात नियमितपणे सुरू न होणे, या प्रकारामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंचाने सोलापूरकरांच्या भावना जाणून घेण्यासाठी विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून पोल आयोजित केला, त्यातून नागरिकांचा तीव्र संताप आणि प्रशासनाच्या या उदासीन कारभाराविरोधातील भावना स्पष्टपणे समोर आल्याचे मंचाने सांगितले आहे.
स्टार एअरने पुन्हा सोलापूर–मुंबई विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सोलापूरच्या विमानसेवेबाबत शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका नेमकी काय आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी Fly91कडून सोलापूर–गोवा आणि सोलापूर–हैदराबाद विमानसेवेबाबत घोषणा करण्यात आल्या होत्या; मात्र या सेवा नियमितपणे सुरू राहिल्या नाहीत. त्याचप्रमाणे सोलापूर–तिरुपती विमानसेवेचे आश्वासनही अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. त्यामुळे सोलापूरकरांना वारंवार नवीन घोषणा, आश्वासने आणि उद्घाटनांच्या बातम्या ऐकायला मिळतात.हा सर्व खटाटोप फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच आहे का हा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
विमानसेवेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधेबाबत एवढ्या हलगर्जीपणाने निर्णय घेतले जात असतील, तर सोलापूरच्या भविष्यातील विकासाचे काय? हा प्रश्न आता प्रत्येक सोलापूरकराने विचारण्याची वेळ आली आहे. विमानसेवा नसेल तर गुंतवणूकदार सोलापूरमध्ये का येतील?
सोलापूर विकास मंचाने या संपूर्ण प्रश्नाला केवळ प्रवाशांच्या गैरसोयीपुरते मर्यादित न ठेवता सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक भवितव्याशी जोडले आहे.
होऊ घातलेल्या आयटी पार्क साठी अनिश्चित विमानसेवा हा फार मोठा धक्का मानला जातो.
सोलापूर विकास मंच सोलापूरकरांच्या भावनांना सोबत घेऊन पुढील तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित करेल,” असा इशारा सोलापूर विकास मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड