वर्धा जिल्ह्याला १५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
वर्धा,07 सप्टेंबर (हिं.स.)राज्य सरकारने वर्ष २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत वर्धा जिल्ह्याला यावर्षी सुमारे १५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ५ लाख ८० हजार ७२७ राेपांची लागवड करण्यात
वर्धा जिल्ह्याला १५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट


वर्धा,07 सप्टेंबर (हिं.स.)राज्य सरकारने वर्ष २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत वर्धा जिल्ह्याला यावर्षी सुमारे १५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ५ लाख ८० हजार ७२७ राेपांची लागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांवर वृक्षलागवडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वनमहोत्सवांतर्गत सप्टेंबर महिन्यापर्यंत ही मोहीम जिल्ह्यात राबवली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख १३ हजार ४४८ रोपांची लागवड करण्यात आली आहे. लावलेल्या रोपांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन विभागाने केले आहे. वनमहोत्सवांतर्गत विविध सरकारी यंत्रणा व संस्थांनी लावलेल्या रोपांच्या नोंदीसाठी ‘अमृत वृक्ष’ ॲप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या ॲपवर जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ३४० रोपांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विविध विभागांद्वारे वृक्षलागवडीची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जात आहे. जिल्ह्यातील विविध विभाग आणि संस्थांना एकूण १५ लाख ९१ हजार ५५४ रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

यामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय ११ लाख रोपे, पाेलिस अधीक्षक (गृह विभाग) १ हजार, शिक्षण विभाग २९ हजार ८० रोपे, कृषी विभाग २ लाख ७७ हजार रोपे, महामार्ग प्राधिकरण ८ हजार ३०७ रोपे, सार्वजनिक बांधकाम विभाग २ हजार ६४१ रोपे, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ५९० रोपे, उद्योग विभाग १ हजार रोपे, रेल्वे विभागाकडून ५००, जलसंपदा १ हजार ५००, विभाग रोपांची लागवड करण्यात आले आहे. याशिवाय सर्व तहसील, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सीएडी कॅम्प पुलगाव आणि कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनसह इतर संस्थांनाही वृक्षलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी ५०० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी महाराष्ट्र हरित आयोगाची स्थापना करण्यात आली असून, या आयोगाच्या देखरेखीखाली ही मोहीम चालवली जात आहे. लावलेल्या रोपांच्या संरक्षण आणि संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांचीच असणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande