वर्धा जिल्ह्यातील 8 गावांना हक्काची स्मशानभूमी नाही
वर्धा, ७ सप्टेंबर (हिं.स.) : देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असतानाही सेलू तालुक्यातील आठ गावांमध्ये आजवर हक्काची स्मशानभूमी उपलब्ध झालेली नाही. एकीकडे ‘समृद्ध महाराष्ट्र’ आणि तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू असल्याचे चित्र उभे केले जात
हक्काच्या ‘विसाव्या’साठी त्यांची वणवणच


वर्धा, ७ सप्टेंबर (हिं.स.) : देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असतानाही सेलू तालुक्यातील आठ गावांमध्ये आजवर हक्काची स्मशानभूमी उपलब्ध झालेली नाही. एकीकडे ‘समृद्ध महाराष्ट्र’ आणि तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू असल्याचे चित्र उभे केले जात असताना, दुसरीकडे नागरिकांना मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सेलू तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असून त्याची भव्यता विकासाचे प्रतीक म्हणून मांडली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अद्यापही बिकट आहे. विशेषतः पावसाळ्यात शेताकडे जाणारे पांदण रस्ते चिखलाने माखल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिस्थितीपेक्षा गंभीर बाब म्हणजे तालुक्यातील आठ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी आणि अधिकृत स्मशानभूमीची जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये स्मशानभूमीचे शेड किंवा आवश्यक सुविधा उभारण्याचा प्रश्नही निर्माण होत नाही. पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी जागा आणि योग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे गावकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

निधी मंजूर, मात्र खर्चासाठी जागेचा पेच

धक्कादायक बाब म्हणजे, या आठ गावांपैकी काही ग्रामपंचायतींना स्मशानभूमीच्या शेडसाठी शासनाकडून निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र, स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच उपलब्ध नसल्याने मंजूर निधी खर्च करायचा कुठे, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.जागेचा शोध घेत असताना वर्षानुवर्षे उलटत आहेत. मात्र, अद्यापही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने शासनाच्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीतील दरी अधोरेखित होत आहे.

‘लोकवस्ती आहे, मग स्मशानभूमीची जागा का नाही..?’

गावात लोकवस्ती असताना नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा का उपलब्ध करून दिली जात नाही, असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात कुठेतरी अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जात असली, तरी मूलभूत सुविधांनी युक्त आणि कायमस्वरूपी स्मशानभूमी मिळणे हा नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.आता या गंभीर समस्येकडे वरिष्ठ प्रशासन कधी लक्ष देणार, त्या आठ गावांना हक्काची स्मशानभूमीची जागा कधी उपलब्ध करून दिली जाणार आणि लोकप्रतिनिधी यावर कोणता ठोस तोडगा काढणार, याकडे संपूर्ण सेलू तालुक्याचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande