
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथील मोसंबी आणि अहिल्यानगर परिसरातील संत्र्याचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात या फळांची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत रविवारी मोसंबीची आवक १० टनांनी, तर संत्र्याची आवक दोन टनांनी वाढली. बाजारात दाखल झालेल्या मालाला चांगली मागणी असल्याने दोन्ही फळांचे दर टिकून राहिले.
बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ड्रॅगन फ्रूट आणि पपईला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने ड्रॅगन फ्रूटच्या दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली. पपईच्या दरातही किलोमागे एक ते दोन रुपयांची वाढ झाली आहे.दरम्यान, गुजरातमधील चिक्कूचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात चिक्कूची आवक वाढू लागली आहे. गुजरातसह कर्नाटक आणि राज्यातील विविध भागांतूनही चिक्कूची तुरळक आवक होत आहे. श्रावण महिना सुरू असल्याने फळांना चांगली मागणी आहे. बहुतांश फळांची आवक आणि मागणी जवळपास स्थिर असल्याने त्यांच्या किमती गत आठवड्याच्या पातळीवर कायम असल्याची माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु