
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
उत्पादन क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याचा परिणाम गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील धान्य आणि डाळींच्या दरांवर दिसू लागला आहे. उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने तूरडाळ आणि मूगडाळीच्या दरात किलोमागे प्रत्येकी पाच रुपयांची, तर हरभराडाळीच्या दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. बेसनच्या भावातही किलोमागे तीन रुपयांनी वाढ झाली.
कर्नाटकातील तांदूळ उत्पादक भागात पावसाने दडी मारल्याने नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल होणाऱ्या नवीन पिकाबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम उकडा आणि कोलम तांदळाच्या दरावर झाला असून, दोन्ही प्रकार किलोमागे एक रुपयाने महागले आहेत. आगामी काळात तांदळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विजय मुथा यांनी व्यक्त केली.
उत्पादन क्षेत्रातून गव्हाची आवक कमी झाल्याने गव्हाच्या दरातही किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे डाळी, तांदूळ आणि गहू महाग होत असताना ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी स्थिती साखरेच्या बाजारात आहे. साखरेच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली असून, किलोमागे पाच रुपयांनी दर कमी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु