खोडवा उसाचे प्रमाण ६० टक्के; साखर हंगाम शंभर दिवसांत आटोपण्याची शक्यता
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात यंदा खोडवा उसाचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून, नव्याने झालेली ऊस लागवड कमी आहे. त्यामुळे क्षेत्रनिहाय उसाचे क्षेत्र अधिक दिसत असले तरी कारखान्यांची वाढलेली प्रतिदिन १०.४० लाख टन गाळप क्षमता लक्षात घेता २०२६-२७ चा
Sugar


पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

राज्यात यंदा खोडवा उसाचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून, नव्याने झालेली ऊस लागवड कमी आहे. त्यामुळे क्षेत्रनिहाय उसाचे क्षेत्र अधिक दिसत असले तरी कारखान्यांची वाढलेली प्रतिदिन १०.४० लाख टन गाळप क्षमता लक्षात घेता २०२६-२७ चा गळीत हंगाम शंभर दिवसांच्या आत संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी कारखाने सरासरी १५० दिवस चालविण्याचे आव्हान पुन्हा एकदा साखर उद्योगासमोर उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना निवेदन देऊन साखर उद्योगासमोरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. मंत्री समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.कमी पर्जन्यमानामुळे उभ्या उसावर दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध ऊस कमी झाल्यास कारखाने शंभर दिवसांपर्यंतच सुरू राहण्याची भीती विस्माने व्यक्त केली आहे. ऊस उपलब्धता वाढविण्यासाठी ऊस विकास कार्यक्रमांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande