दोन Gen Z च्या नजरेतून उलगडणार आजच्या पिढीची गोष्ट; ‘मॅगझिन’चा फर्स्ट लुक प्रदर्शित
मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.)। आजची Gen Z पिढी जगभर फिरते, स्वतःची ओळख घडवते, नव्या शक्यता शोधते, पण या सगळ्या प्रवासात एक प्रश्न कायम तिच्यासोबत असतो; “आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?” याच भावनेला एका समकालीन आणि तरुण दृष्टिकोनातून पडद्यावर मांडणारा आगा
upcoming Marathi film ‘Magazine’ first look revealed


मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.)। आजची Gen Z पिढी जगभर फिरते, स्वतःची ओळख घडवते, नव्या शक्यता शोधते, पण या सगळ्या प्रवासात एक प्रश्न कायम तिच्यासोबत असतो; “आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?” याच भावनेला एका समकालीन आणि तरुण दृष्टिकोनातून पडद्यावर मांडणारा आगामी मराठी चित्रपट ‘मॅगझिन’ येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gen Z च्या बदलत्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. वेगळं आणि उत्सुकता निर्माण करणारं शीर्षक, त्याला साजेसं दृश्यविश्व आणि तरुणाईशी थेट संवाद साधणारी मांडणी यामुळे ‘मॅगझिन’ने प्रदर्शनापूर्वीच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मॅगझिन’ ही केवळ Gen Z ची गोष्ट नाही; तर Gen Z ला समजून घेण्याचा आणि तिच्या माध्यमातून जुन्या-नव्या पिढ्यांमधला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आजची तरुण पिढी आपल्या करिअरच्या, नात्यांच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा निवडत असताना ‘घर’, ‘आपली माणसं’ आणि ‘आपली मुळं’ यांच्याशी तिचं नातं नेमकं कसं बदलतं, याचा भावनिक वेध चित्रपट घेणार असल्याचे संकेत मिळतात.

सोशल मीडिया, सतत बदलणारी जीवनशैली आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या धडपडीत वाढलेली Gen Z एका बाजूला आधुनिक जगाशी जोडलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्या मुळांशी असलेलं नातं तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन जगांच्या मधोमध उभ्या असलेल्या तरुण पिढीचा हा भावनिक प्रवास ‘मॅगझिन’मधून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कथेचे अनेक पैलू निर्मात्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहेत. मात्र, पोस्टरमधून हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून स्वतःचा शोध घेण्याचा आणि आपल्या मुळांकडे पुन्हा पाहण्याचा प्रवास असल्याचे जाणवते. ‘मॅगझिन’चे दिग्दर्शन शुभम संजय शेवडे यांनी केले आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात दडलेल्या असामान्य अनुभवांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटात नवे चेहरे आणि अनुभवी कलाकार एकत्र आले आहेत. त्यामुळे पडद्यावर केवळ दोन वेगवेगळ्या पिढ्यांची उपस्थिती नाही, तर त्यांच्या विचारांचा, अनुभवांचा आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा संवादही पाहायला मिळणार आहे. याबद्दल दिग्दर्शक शुभम संजय शेवडे म्हणाले, “‘मॅगझिन’च्या माध्यमातून आम्हाला एका प्रवासाची दोन टोकं एकत्र आणायची होती. पहिल्यांदा पाऊल ठेवणारे नवे आवाज आणि अनेक वर्षांचा अनुभव आपल्या अभिनयातून मांडणारे अनुभवी कलाकार. या भेटीतच चित्रपटाची मोठी आशा दडलेली आहे. प्रत्येक पिढी आपल्या मागे काहीतरी ठेवून जाते आणि प्रत्येक नवी पिढी ते आपल्या पद्धतीने पुढे घेऊन जाते.”

चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ही वेळ निवडण्यामागची भूमिका स्पष्ट करताना शेवडे म्हणाले, “दिवाळी म्हणजे नेहमीच परतण्याचा उत्सव राहिला आहे. कधी एखाद्या ठिकाणी, कधी आपल्या माणसांकडे, तर कधी एखाद्या नव्या दृष्टिकोनाकडे. ‘मॅगझिन’ हा चित्रपट कुटुंबांनी एकत्र चित्रपटगृहात जाऊन अनुभवावा आणि तो अनुभव आपल्यासोबत घरी घेऊन जावा, अशी आमची इच्छा आहे.”

विशेष म्हणजे, ‘मॅगझिन’ने बर्लिन, स्टुटगार्ट, सिडनी तसेच भारतातील काही राज्यांमध्ये झालेल्या विशेष स्क्रीनिंगमध्ये आपल्या वेगळ्या आवाजामुळे आणि भावनिक कथाकथनामुळे कौतुक मिळवलं आहे. Gen Z च्या प्रश्नांना, त्यांच्या भावविश्वाला आणि ‘घराकडे परतण्याच्या’ बदलत्या अर्थाला मराठी सिनेमाच्या माध्यमातून मांडणारा ‘मॅगझिन’ यंदाच्या दिवाळीत एक वेगळा अनुभव देण्यास सज्ज झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande