
दुबई, 07 सप्टेंबर (हिं.स.) महिला आशिया कप २०२६ सध्या दुबईमध्ये सुरू आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने साखळी फेरीतील आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेनेही गट फेरीतील सामन्यात बांगलादेशला पराभूत करत अव्वल स्थान पटकावले. आता श्रीलंका आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
महिला आशिया कप २०२६ च्या दहाव्या सामन्यात बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी झाला. प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेश महिला संघाकडून शोभनाने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर दिलारा अख्तरनेही २६ धावांचे योगदान दिले. बांगलादेशला केवळ ११४ धावाच करता आल्या, ज्यात चामुडी प्रबोधाने तीन आणि सुगंधिका कुमारीने दोन बळी घेतले. ११५ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेने ४४ धावांत पाच गडी गमावले. तथापि, हर्षिता समरविक्रमाने चार चौकार आणि दोन षटकारांसह ३७ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा करून अखेरीस संघाला गट फेरीतील तिसरा सामना जिंकून दिला.
श्रीलंकेच्या महिला संघाने बांगलादेश, युएई आणि इंडोनेशियाला पराभूत करून गट 'ब' मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने गट 'अ' मध्ये अव्वल स्थान पटकावले. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना गट 'ब' मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. बांगलादेश आणि युएई यांच्यातील उर्वरित सामन्याचा विजेता उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना करेल. उपांत्य फेरीपूर्वी ८ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि युएई यांच्यात उपांत्यपूर्व फेरीसारखा सामना खेळला जाईल, तर भारताचा उपांत्य सामना १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे