
रत्नागिरी, 8 सप्टेंबर (हिं.स.) ।संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील स्वराज्याचे सरसेनापती मल्होजीराजे घोरपडे यांच्या समाधीचे जतन, संवर्धन व विकास करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या दालनात तातडीने विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय श्रीधर नातू यांनी पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा (भाग ३) अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे विकसित करण्याच्या योजनेत कारभाटले येथील समाधी जतन कामाचा समावेश आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी २ लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केले आहेत. दुसरीकडे कारभाटले ग्रामपंचायत आणि देवी संस्थान यांनीही घोरपडे वंशजांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत.
स्वराज्याचे सरसेनापती मल्होजीराजे घोरपडे यांना कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांसोबत मुघलांशी लढताना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या दोन्ही आराखड्यांमध्ये सुसूत्रता येणे अत्यंत आवश्यक आहे.
या बैठकीला चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री अजितदादा घोरपडे, आमदार मनोजदादा घोरपडे, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान पुणे व घोरपडे वंशजांना निमंत्रित करण्याची सूचनाही श्री. नातू यांनी केली आहे.
या सर्व घटकांची संयुक्त बैठक झाल्यास दोन्ही आराखडे व मागण्या एकत्र करून 'श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा (भाग ३)' चे आराखडे अधिक प्रभावीपणे बनवले जातील.यामुळे ग्रामपंचायत आणि घोरपडे वंशज यांच्या रास्त मागण्यांचाही यात समावेश होईल, असा विश्वास डॉ. विनय नातू यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी