
रत्नागिरी, 8 सप्टेंबर (हिं.स.) । शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्रिय आहे. रुग्णांची अडवणूक, उपचारांत दिरंगाई किंवा अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयांना चाप लावण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीने सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांवर आपली करडी नजर ठेवली आहे. त्यानुसार १४ रुग्णालयांनी रुग्णांकडून घेतलेले पैसे समितीकडील तक्रारीनंतर परत केले आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून या समितीची धुरा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून, जिल्हा शल्य चिकित्सक समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीत प्रशासकीय, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे जिल्हा प्रमुख, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक, भारतीय वैद्यकीय परिषदेचे (IMA) प्रतिनिधी , सहायक संचालक (वैद्यकीय) व उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ (मुंबई) तर्फे शिफारस केलेले २ ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी मारुती गोविंद आंब्रे व दत्तात्रय पांडुरंग चाचले यांची निवड करण्यात आली आहे.
नागरिकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि प्रशासनात पारदर्शकता राहावी, यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींचा समावेश करून समिती अधिक संवेदनशील व लोकाभिमुख करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत दाखल होण्यापासून ते घरी जाईपर्यंत सर्व उपचार पूर्णपणे मोफत (कॅशलेस) देणे रुग्णालयांवर बंधनकारक आहे. रुग्णालयात कोणतीही अडचण आल्यास अथवा गैरव्यवहार आढळल्यास नागरिकांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा - प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात मदतीसाठी आरोग्यमित्र २४ तास तैनात असतात.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा समन्वयकांशी थेट संपर्क साधावा.
याखइवाल टोल फ्री क्रमांक १४५५५ / १८०० २३३ २२० / १५५३८८ येथे किंवा www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर संपर्क सधावा.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि शासकीय नियमांचा भंग करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी